“वाद विकोपाला ! सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष आमदारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

“टीम सहकार टाइम्स”
स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा समाजाला झुलवत ठेवू नये आणि महाराष्ट्राचा मणिपूर करू नये असे वक्तव्य आ. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून केले आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवून त्यात आपली भूमिका स्पष्ट करावी. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे असेल तर तसे सांगावे. मात्र समाजाला झुलवणे बंद करावे असा टोला आमदार राऊत यांनी लगावला.
सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा, बाकी काहीही बोलू नका असा टोलाही त्यांनी मनोज जरांगे यांना लगावला. आ. राजेंद्र राऊत यांचे गुरूवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले.
मी बार्शीचा अपक्ष आमदार असून माझे विरोधक महाविकास आघाडीत असल्याने गेली अडीच वर्ष मी विरोधात होतो. सत्ता आल्यानंतर मी एकनाथ शिंदें सोबत असलो तरी वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी मराठा आंदोलनात काम केलेली आहे.असं राजेंद्र राऊत म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात जे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत त्यांच्या विरोधात सर्व मराठा समाजाने मतदान करावे असे आवाहन राऊत यांनी केले. यानंतरच प्रत्येक प्रत्येक पक्षाची अंधारातील भूमिका आणि खरी भूमिका उघड होऊन दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाईल.
मी हेच फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित पवार यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे. बहुतांश सर्व पक्षांना आणि आमदारांना माझी पत्र गेली असून आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांना विशेष अधिवेशन घेण्यासाठी पत्र पाठवायचे आहे.
कोणीही मराठा समाजाचा गैरवापर करू नये. मराठा सम ाजाची फसवणूक न करता योग्य मार्गाने न्याय द्या असा इशाराही त्यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता दिला. मी मराठा समाजाबद्दल एखादा विचार मांडला तर कोणाला राग यायचे काय कारण? जरांगे कोणती बाजू घेतात ते सर्वांना माहीत आहेत. आता मी माझी बाजू स्पष्ट केलेली असून आता त्यांनी आमदारांकडून विशेष अधिवेशनासाठी पत्र घ्यावीत असा आवाहन ही राऊत यांनी केले.
राज्यातील जास्तीत जास्त आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्यासाठी मागणी केल्यास अध्यक्षांना अधिवेशन घ्यावेच लागेल. यासाठी समाज बांधवांनी सर्व आम दारांकडे जाऊन अध्यक्षांना पत्र देण्याची विनंती करण्याची आवाहनही राऊत यांनी केले. राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर करून पोळी भाजणे बंद करावे असा टोला विरोधकांना लगावताना महाराष्ट्राचे मणिपुर करायचे आहे का? असा सवाल त्यांनी केला.
“आ. राजेंद्र राऊत यांनी सुरु केलेल्या आंदोलनास सरकारी आंदोलन म्हणत फडणवीसांनाही लक्ष्य केले. समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहित आहे, समाज हुशार आहे, समाज सगळे बघतोय. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली ना, दिवस जवळ आले आहेत, समाज सगळं बघतोय, त्यांचा हिशेब होणार, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनावर तोफ डागली आहे. राजकीय पक्षाचे जोडे उचलणारे, राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले किती गेले हे सगळे भाजप संपणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांच्याविरुद्ध बोलणाऱ्या भाजप आमदार व नेत्यांवर जरांगेंनी पलटवार केला आहे.”
जर सर्वच पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला, तर सरळ ५ कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरच बहिष्कार घालावा.
आ. राजेंद्र राऊत




