मंगळवेढा तालुक्यात डिजिटल जनगणनेचा आज प्रारंभ; प्रगणक घरी आल्यानंतर ही माहिती देऊन सहकार्य करावे -जनगणना अधिकारी तहसीलदार मदन जाधव

मंगळवेढा तालुक्यात डिजिटल जनगणनेचा आज प्रारंभ; प्रगणक घरी आल्यानंतर ही माहिती देऊन सहकार्य करावे -जनगणना अधिकारी तहसीलदार मदन जाधव
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज १ मे पासून डिजिटल जनगणना मोहिमेला प्रारंभ होत आहे. २०२७ साली होणारी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असून तालुक्यात प्रथमच अशा आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा १ ते १५ मे या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जनगणना अधिकारी तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
या टप्प्यात नागरिकांना स्वयंनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर जाऊन एकूण ३४ प्रश्नांची माहिती भरायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा युनिक कोड पुढील टप्यात प्रगणकाला देणे आवश्यक राहणार आहे. दुसरा टप्पा १६ मे ते १४ जून दरम्यान होणार असून या काळात प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. स्वयंनोंदणी केलेल्या नागरिकांना फक्त युनिक कोड देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
या जनगणनेत नागरिकांची वैयक्तिक माहिती, कुटुंब रचना, घराचा प्रकार, सदस्यांची संख्या तसेच घरातील उपलब्ध सुविधा याबाबत सविस्तर माहिती गोळा करण्यात येणार आहे. ही माहिती केवळ सांख्यिकीय उद्देशासाठी वापरण्यात येणार असून नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण हमी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तालुकास्तरावर या मोहिमेसाठी तयारी पूर्ण झाली असून पर्यवेक्षक व प्रगणकांचे प्रशिक्षण सुरू आहे.
जनगणनेच्या कामकाजासाठी मंगळवेढा तालुक्यात ५९ पर्यवेक्षक आणि ३१४ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतामध्ये जनगणनेची परंपरा १८७२ पासून सुरू असून यंदाची जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार आहे
याबाबत चार्ज अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना माहिती देऊन सहकार्य करावे, तसेच स्वयंनोंदणी सुविधेचा लाभ घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा.



