Uncategorized

“मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड महाराष्ट्र हिंद केसरी’ ; तब्बल तीन पिढ्यांची कुस्तीची परंपरा

“पहिल्या दहा सेकंदातच महेंद्रने आक्रमक पवित्रा घेत डाव करण्याचा प्रयत्न केला. त्यात पृथ्वीराजच्या हाताला इजा झाली. त्यामुळे कुस्ती थांबवण्यात आली. यात महेंद्रला दोन गुण मिळाले. काही वेळाने कुस्ती सुरू झाली. मात्र, पृथ्वीराजने लढतीतून माघार घेतली अन् महेंद्र हिंद केसरी ठरला”

सातारा, ता. १७ : येथे रात्री उशिरा झालेल्या ५२ व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा महेंद्र गायकवाड ऊर्फ बाहुबली ‘हिंद केसरी’ ठरला. त्याने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात केली. पृथ्वीराजला दुखापत झाल्याने त्याने माघार घेतल्यावर महेंद्रला विजयी घोषित करण्यात आले. महेंद्रला महाराष्ट्र केसरीने तब्बल तीनदा हुलकावणी दिली होती. मात्र, यंदाच्या (२०२४-२५) हिंद केसरीच्या गदेवर त्याने नाव कोरले. मोहोळचे महाराष्ट्र केसरीसह हिंद केसरी होण्याचे स्वप्न भंगले.

महेंद्र हा महाराष्ट्राचा दहावा, तर देशाचा ३९ वा हिंद केसरी ठरला. यापूर्वी श्रीपती खंचनाळे (१९५९), गणपतराव आंधळकर (१९६०), मारुती माने (१९६४), हजरत पटेल (१९६६), दीनानाथ सिंह (१९७१), चंबा मुतनाळ (१९७५), विनोद चौगुले (२००३), योगेश दोडके (२००५), अभिजित कटके (२०२३) यांनी ही कामगिरी केली होती. त्यात महेंद्रची भर पडली.

काजल धोचक (हरियाना) व खुशी दलाल (दिल्ली) यांच्यात महिला हिंद केसरी किताबासाठी लढत झाली. त्यात काजलने खुशीला चीतपट करून बाजी मारली. डबल महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीने कांस्य पदक (तृतीय क्रमांक) पटकावले. तिने हरियानाच्या मीनूवर विजय मिळवला.

राज्य भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान व तालीम संघाच्या वतीने साहेबराव पवार शतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित ५२ व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत वरील महेंद्र व काजलने ही सुवर्ण कामगिरी केली. महेंद्र दिल्लीच्या अनिरुद्ध कुमारला हरवून किताबी लढतीसाठी धडकला होता, तर पृथ्वीराजने एनसीआरच्या (उत्तर-मध्य विभाग) रजतवर मात करीत अंतिम सामन्यात झेप घेतली.

त्यापूर्वीच्या सामन्यात त्याला पराभवास सामोरे जावे लागले होते. पृथ्वीराजला संपूर्ण स्पर्धेत त्याचे वडील प्रशिक्षक होते. तेही उपमहाराष्ट्र केसरी आहेत, तर महेंद्रच्याही घरात पैलवानकीचा वारसा आहे. हे कुटुंबीय मंगळवेढातील शिरसीचे आहे, तर मोहोळ कुटुंबीय मुळशी तालुक्यातील मुठाचे आहे. यापूर्वी चार महाराष्ट्र केसरींनी हिंद केसरीची गदा पटकावली होती.

तीन पिढ्यांची कुस्ती परंपरा

महेंद्र गायकवाड यांच्या घराला तीन पिढ्यांची कुस्ती परंपरा आहे. मंगळवेढा तालुक्यातील शिरसी हे त्यांचे गाव. शेती हा त्यांच्या कुटुंबांचा मुख्य आधार. घराला वारीची आणि लाल मातीची परंपरा. आजोबा शंकर, वडील बाबासाहेब, चुलते काकासाहेब आणि महेंद्र अशी लालमातीत झुंजणाऱ्या पिढीची नावे. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीत राबवणाऱ्या गायकवाड यांच्या शिरसी गावात १९६६ मध्ये तालमीची स्थापना झाली. याच तालमीत महेंद्र गायकवाड यांनी कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. येथेच चुलते काकासाहेब आणि वडील बाबासाहेब कुस्ती खेळत. आईवडील, चुलते, भाऊ आणि इतरांच्या देखरेखीखाली महेंद्र गायकवाड यांची कुस्ती क्षेत्रातील वाटचाल सुरू राहिली आहे. दहावीपर्यंत ते याच तालमीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button