मोठी बातमी!पैलवान सिकंदर शेख यांच्या थार गाडीचा तालुक्यात भीषण अपघात;चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

मोठी बातमी!पैलवान सिकंदर शेख यांच्या थार गाडीचा तालुक्यात भीषण अपघात;चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याच्या थार गाडीचा कवठेमहांकाळ तालुक्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील विठ्ठलवाडी परिसरात हा अपघात घडला. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास थार गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगतच्या डिव्हायडरवर जाऊन आदळले. धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातावेळी गाडीत सिकंदर शेख स्वतः उपस्थित होते की नाही, याबाबत सुरुवातीला संभ्रम होता. मात्र प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सिकंदर शेख गंभीर जखमी झाले नसून ते सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सिकंदर शेख यांचे चाहते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला.
सिकंदर शेख हे महाराष्ट्रातील कुस्ती विश्वातील लोकप्रिय नाव मानले जाते. विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमधील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या गाडीच्या अपघाताची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




