कुटुंबाचे कधीही न भरून निघणारे नुकसान!आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू ;एकाच कुटुंबातील तिघांचा अंत
मंगळवेढा तालुक्यातील घटना

आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू ;एकाच कुटुंबातील तिघांचा अंत मंगळवेढा तालुक्यातील घटना
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे.आईसोबत जळण आणण्यासाठी गेलेल्या मातेसह दोन चिमुकल्यांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली अनिल घोडके (वय ३६) या आपल्या दोन मुलांसह—श्रेया अनिल घोडके (वय १२) आणि सोहम अनिल घोडके (वय १०) स्वयंपाकासाठी जळण (लाकूड) गोळा करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.यावेळी शेतातील साठवण तलावाजवळ ही दुर्घटना घडली.पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच घटनास्थळी शोधकार्य सुरू केले.
पोलीस निरीक्षक बोरिगीड्डे, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, विजय पिसे, हवालदार बसवराज कोष्टी, नितीन पलूसकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विनायक जाधव यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली.शुक्रवार रात्री उशिरा आई वैशाली घोडके यांचा मृतदेह हाती लागला होता. मात्र, रात्र झाल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. शनिवारी पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यानंतर श्रेया आणि सोहम या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
अनिल घोडके यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.हसत्या-खेळत्या कुटुंबातील आई आणि दोन कोवळ्या जीवांचा अशा प्रकारे अंत झाल्याने सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष गावातून दुःख व्यक्त केले जात आहे. मंगळवेढा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.



