एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरूवात !मंगळवेढा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी


मंगळवेढा शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली .गेली तीन चार दिवस पावसाने राज्यासह सोलापूर जिल्ह्यात मोठी हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजाला थोडासा दिलासा मिळाला या पावसामुळे ग्रामीण भागातील ऊस पिकाला या पाण्याचा मोठा फायदा झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.एक दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पाऊस पडत आहे.
ग्रामीण भागात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. पावसामुळे जनावरांना शेतातून वैरण तोडून आणून घालणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले होते तालुक्यात गेली चार दिवस सूर्य उगवलाच नसल्याने हवेत गारवा निर्माण झाला.
मंगळवेढा तालुका प्रामुख्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो गतवर्षीच्या तुलनेत मे अखेरीस मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी खरिप पिकांच्या मशागतीकडे वळला आहे.
पाच-सहा दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सध्या नीरा पात्रात याठिकाणी २७ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. भीमा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पूर्वीचेच पाणी आहे. आता सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्यांवरून पाणी जाईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, पाणी जास्त असल्यास बंधाऱ्यावरून प्रवास टाळावा, असे आवाहन भीमा पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगवले यांनी केले आहे.
कोट
मंगळवेढा तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस पडल्यामुळे आंबा फळ पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असले तरी या पावसाचा उस पिकाला पाण्याचा फायदा झाला असून खरिप पिकाच्या पेरणीसाठी तालुक्यातील शेतकरी तयारी करत आहेत.
श्रीमंत केदार तालुका अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना




