
संदिप लिगाडे
मंगळवेढा : सोलापूर जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन व भाजप आमदार समाधान आवताडे यांचे काका बबनराव आवताडे यांनी आज काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.बबनराव आवताडे व सिध्देश्वर आवताडे गटाची बैठक काल लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संपन्न झाली यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहिर केली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे, शैलेश आवताडे, दामाजी नगर ग्रामपंचायतचे सरपंच जमीर सुतार, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार, दामाजी शुगरचे संचालक दयानंद सोनगे, उद्योजक बापू सलगर, बठाणचे माजी सरपंच संजय बळवंतराव,प्रशांत गायकवाड, प्रदीप यादव, दादा गरंडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे, दिलीप सावंत, सिद्धेश्वर पाटील, श्रीशैल्य पाटील, सचिन नकाते, उद्योजक दत्तात्रय जाधव आदीजन उपस्थित होते.
सिध्देश्वर आवताडे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कार्यकर्ता मेळावा आयोजित करून आज आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. देशाचा जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे गरजेचे आहे.
राजकीय निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांचा निर्णय घेणे गरजेचे आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये काम करत असताना तरुणांना, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी माझ्या लक्षात आल्या.शेतकऱ्यांचे तर प्रचंड हाल सुरू आहेत. दुधाला भाव नाही, जनावरांना पाणी नाही. याच पाण्यावर गेले किती वर्षे राजकारण सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात तर पाणी मिळाले नाही.
आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळाला नाही. ही खूप निराशाजनक बाब आहे.पिक विम्या बाबत भाजप सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली दूध दरा संदर्भात आम्ही अनेक आंदोलन केली. एवढी आंदोलन करून सुद्धा शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळाली नाही.सुशीलकुमार शिंदे खासदार असताना त्यांनी विजापूर मंगळवेढा रेल्वे मार्ग मंजूर केला होता भाजप सरकारने हा मार्ग देखील पूर्ण केला नाही.आपला लोकप्रतिनिधी सुशिक्षित, कर्तबगार असावा यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत असे सिद्धेश्वर आवताडे यांनी सांगितले.




