राजकीय खलबतं ! आमदार रणजित सिंह मोहिते पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला,तब्बल दिड तास चर्चा !

अकलूजचे भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याने पक्षानं मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
सबळ पुराव्यांचा आधार घेत पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला ठोकण्याचा निर्णय घेतलाय की काय? असा प्रश्न विचारला जातोय. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडूनच आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप राम सातपुतेंनी केली होता. त्यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. अशातच आता रणजितसिंह मोहिते पाटलांनी थेट मातोश्री गाठली.
रणजित सिंह मोहिते पाटील मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील आज तब्बल दीड तास मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. एकीकडे भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? यावर अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती, त्यामुळे मोहिते पाटलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला अन् भाजपला मोठा धक्का बसला. रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरुद्ध धैर्यशील मोहिते पाटलांनी दणक्यात विजय मिळवला होता.
त्यावेळी देखील रणजित सिंह मोहिते पाटलांवर भावाला मदत केल्याचा आरोप झाला होता. तर विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्याविरुद्धच रणजितसिंह मोहिते पाटलांनी मोहिम उघडल्याचं बोललं जात होतं.



