विधानसभेनंतर अजित पवार आपल्या मूळ व्यवसायाकडे परत येतील, उमेदवार उत्तमराव जानकरांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते अशी टीका शरद पवार गटाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी केली. बारामती मतदारसंघातून त्यांच्या पत्नीचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला होता.
तीच अवस्था आता अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान 75000 मतांनी मागे असल्याचे जानकर यांनी सांगितलं. या निवडणुकीनंतर राजकारणातून संपलेले अजित दादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या गोठ्याकडे परततील असा टोलाही उत्तम जानकर यांनी लगावला.
माळशिरसमध्ये जर भाजपला उमेदवार मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन असा खोचक टोला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी लगावला. विद्यमान आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये सध्या तिकीट देण्यावरून संघर्ष सुरु आहे.
राम सातपुतेंनी जो काही मलिदा येथे मिळवला तो खर्च करुन निवडणूक लढवा असा भाजपचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, सातपुते निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.




