“महायुतीसाठी अभिजीत पाटलांचे ठरले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या उपस्थितीत विठ्ठल कारखान्यावर….!
संदिप लिगाडे

पंढरपुर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास बाकी असताना आता नाट्यमय राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत.

महायुतीचे माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजीतसिंह निंबाळकर व सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते या दोन्ही उमेदवारांसाठी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील गटाकडून जाहीर पाठिंबा दिला जाणार आहे.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार रोजी १२:३० वाजता विठ्ठल कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.
अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील व सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेत प्रचार केला होता परंतु राजकारणात काही नाट्यमय घडामोडी झाल्यामुळे अभिजीत पाटलांनी शरद पवार गटाची साथ सोडून महायुतीचा प्रचार करणार असल्यामुळे मतदार काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले.
शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आलं आहे. कर्ज थकवल्याच्या मुद्द्यावरून बँकेने अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्याच्या गोदामाला सील ठोकलं. मात्र पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर चक्रं फिरली आणि अभिजीत पाटलांच्या कारखान्यावरील संकटही दूर झालं आहे.




