जनावरांच्या दवाखान्यात होणार बदल ! तुकाराम मुंढेंचे पशुसंवर्धन धोरण आहे तसे स्वीकारले, तालुक्यात आणखी नवीन दवाखाने, दूध उत्पादक, पशुपालकांची समृद्ध होणार समृद्धी

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असताना त्यांनी या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी एक धोरण तयार केले. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत कुठलाही बदल न करता ते मंजूर करण्यात आले.
मुंढे यांच्या वारंवार बदल्या केल्या जातात आणि त्यावर चर्चादेखील होत असते, पण पशुसंवर्धन विभागात अल्पकाळ असतानाही त्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकासात आमूलाग्र बदल सुचविणारे धोरण तयार केले. विभागाची केवळ पुनर्रचनाच न करता दूध उत्पादक, पशुपालकांची समृद्धी कशी होईल, यावर फोकस करत हे धोरण त्यांनी बनविले.
– पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून दोन्ही विभाग एकत्र करणार. त्यामुळे प्रशासन प्रभावी बनेल.
– विभागाचे नाव पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग असे असेल.
– पशु व पशुजन्य उत्पादकतेत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर पडेल.
– पशुपालनाऐवजी पशू उद्योजकता ही संकल्पना विकसित करणार.
– विभागात १५,५५२ इतकी पदे असतील. ७,२५६ पदे नव्याने भरणार.
– ३५१ तालुक्यांमध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयांची निर्मिती
– ३१७ तालुक्यांमध्ये तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू केले जातील.
– पशुसंवर्धन, दुग्धविकासाशी संबंधित सर्व विषय (उत्पादन ते विक्री) एका छताखाली आणाणार
– दुध उत्पादकांच्या उत्पादनांची विक्री करणारी प्रभावी यंत्रणा तयार करणार. पशुंच्या आरोग्याची काळजी या विषयावर फोकस.
– कालबाह्य झालेली बरीच पदे रद्द करणार, काळाच्या गरजेनुसार आवश्यक असलेली कौशल्यपदे निर्माण करणार.
– पशुंवरील उपचारासाठी तालुका पातळीपर्यंत अत्याधुनिक यंत्रणा बसविणार.दूध उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाययोजना. दूध उत्पादनात जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण केली जाईल.




