कामासाठी घर सोडले अन् मृत्यूने गाठले!सांगोलजवळ क्रुझर जीप पलटी होऊन अपघात, तीन महिला मजुरांचा जागीच मृत्यू,जखमींना उपचारासाठी तात्काळ हलवले

सांगोला : भरधाव वेगात जाणा-या क्रुजर जीपचे टायर फुटून पलटी झाल्याने तीन महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याच अपघातात जीपमधील नऊ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली.
मिळालेली प्राथमिक माहिती अशी आज सकाळी बेळगांव जिल्ह्यातील अथणी येथील चौदा महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचेगाव येथील द्राक्ष बागेत काम करण्यासाठी जात होत्या. दरम्यान, जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक फुटल्याने जीप पलटी झाली.
जीप पलटी झाल्याने जीपमधील महिला या बाहेर फेकल्या गेल्या.त्यामुळे तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजला हलविले आहे. मृत व जखमी महिला या बेळगांव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळोग्री व ममलाद या दोन गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघाताची माहिती मिळताच सांगोला तालुका पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी मदत केली.



