“कामचुकार आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस, तातडीने निलंबनाचा प्रस्ताव पाठवला

“कामचुकार आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस, तातडीने निलंबनाचा प्रस्ताव पाठवला
पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अपघातातील गंभीर जखमी तरुणाला उपचार न मिळाल्याने खासगी रुग्णालयात हलवावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने प्रशासनाने तातडीने कडक कारवाई सुरू करून दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
तसेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.जवळगाव येथील राहुल अर्जुन कापसे हा तरुण १८ जून रोजी सायंकाळी सोलापूर रोडवर वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन त्यात खांदा व हात रक्तबंबाळ झाला होता.
स्थानिक नागरिक अरुण मस्तूद, पिंटू नाईकवाडी आणि प्रशांत गायकवाड यांनी त्याला तातडीने पानगाव पी.एच.सी.येथे उपचारास आणले.
पण केंद्राच्या प्रवेशद्वारास कुलूप लावलेले होते; परंतु रुग्णवाहिका उभी होती. उपस्थित कर्मचाऱ्यांकडे गेटची चावी नव्हती तर दोन्ही डॉक्टरही अनुपस्थित होते.त्यामुळे प्राथमिक उपचार न मिळाल्याने राहुलला बार्शी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.



