Uncategorized

मंगळवेढा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपास सुरुवात :तहसीलदार मदन जाधव

मंगळवेढा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपास सुरुवात

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांना शासन नियमानुसार देय असलेल्या मोफत वाळू वाटपाच्या कार्यक्रमास मंगळवार दि. 24 पासून सुरुवात करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी 31 लाभार्थ्यांना पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे व प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्या हस्ते ई चलन व गुलाब पुष्प देऊन लाभार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना वाळूचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार मदन जाधव, गट विकास अधिकारी डॉ.जसमीन शेख, नोडल अधिकारी श्रीनिवास शेरला, मंडळ अधिकारी महेश पवार, ग्राम महसूल अधिकारी सचिन वाघमारे, ग्राम पंचायत अधिकारी संगीता माने व इतर नागरिक उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत एकूण 9219 घरकुल लाभार्थी असून सद्यस्थितीत पात्र लाभार्थी 8579 आहेत. त्यातील बांधकाम चालू असलेल्या घरकुलाची स्थिती पाहून त्यांना आवश्यक वाळू मोफत देण्यात येणार आहे.

घरकुल लाभार्थ्यांना आपल्या घराच्या बांधकामासाठी मोफत वाळू मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक 31/12/2025 रोजी परिपत्रक काढून घरकुल साठी वाळू वाटपाची कार्यपद्धती निश्चित केली आहे.

त्यानुसार घरकुल बांधकामाचे टप्पे निश्चित करून त्या त्या टप्प्याला बांधकाम आले की वाळू वाटप केले जाणार आहे. ही प्रक्रिया प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी राबवली जाणार असल्याने आता घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार पंचायत समिती मार्फत प्रथम पात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर घरकुलाचा पाया खोदताना 2 ब्रास व पुढील बांधकामास 3 ब्रास याप्रमाणे मोफत वाळू दिली जाणार आहे.

पात्र लाभार्थ्यांची माहिती महाखनिज प्रणालीवर अपलोड करून लाभार्थ्यांची आधार कार्डच्या माध्यमातून पडताळणी करून त्यांना ई चलन काढून वाहतूक पास देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना ई चलन देण्यात येईल त्या लाभार्थ्यांना दर मंगळवारी व शुक्रवारी त्यांच्या जवळच्या वाळू गटातून मोफत वाळू दिली जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीनिवास शेरला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी 31 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 ब्रास वाळूचे वाटप तांडोर येथील वाळू गटातून करण्यात आले.

पंचायत समिती मार्फत प्रत्येक आठवड्याला पात्र लाभार्थी यांना ई चलन तयार करून मोफत वाळू दिली जाणार आहे, याचा लाभ तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव व गटविकास अधिकारी जसमीन शेख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button