मंगळवेढा मराठी विषयाच्या पेपरला १० डमी विद्यार्थी ;गुन्हा दाखल
बनावट ओळखपत्रांच्या आधारे परीक्षा देण्याचा प्रकार
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री. बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, परीक्षा केंद्र क्रमांक ३१/८४ येथे दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी विषयाच्या पहिल्याच पेपर दिवशी धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
परीक्षा सुरू असताना केंद्र संचालक व उपकेंद्र संचालकांनी अचानक केलेल्या तपासणीत सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी येथील ९ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी असे एकूण १० डम्मी परीक्षार्थी रंगेहाथ पकडले गेले. बनावट ओळखपत्रांच्या आधारे परीक्षा देण्याचा हा उघड प्रयत्न होता.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता बोर्डाच्या नियमांनुसार तात्काळ कारवाई करण्यात आली असून संबंधितां विरोधात मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.पहिल्याच पेपरला एवढ्या मोठ्या प्रमाणात डमी उमेदवार सापडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असले, तरी केंद्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.