सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हाती तुतारी,म्हणाले या मतदार संघातून निवडणूक लढवणार
मंगळवेढा प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला असून,ते मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमवणार आहेत. राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी तुतारी हाती घेतली. खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कार्याचे मोठे कौतुक केले.याप्रसंगी आ. जितेंद्र आव्हाड, अभिजीत ढोबळे यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.
लक्ष्मणराव ढोबळे हे तसे शरद पवार यांचे निकटवर्तीय. गेल्या साठ वर्षापासून त्यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याशी ऋणानुबंध जपला आहे. मागील काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील काही दिवसापासून त्यांनी भाजप पासून फारकत घेणे सुरू केले होते.अखेर बुधवार दि.२३ ऑक्टोबर रोजी त्यांनी,राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची भेट घेत,राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे असंख्य अनुयायी उपस्थित होते.
लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे साळुंखे यांनी काही दिवसापासून सबंध राज्याचा दौरा केला होता.बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी भाजपवरील नाराजी व्यक्त केली होती. हे करीत असताना ढोबळे यांच्या पक्षबदलाचे संकेत दिले होते.
मागील काही दिवसांपासून ढोबळे हे मोहोळ विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे सांगत होते.सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला होता. यावेळी ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिले होते. आता पुन्हा याच जुन्या रिंगणात तुतारी हाती घेऊन ते उतरणार आहेत. मोहोळ आणि तालुक्यातील जनतेशी त्यांचा मोठा ऋणानुबंध आहे. याचा फायदा या निवडणुकीत त्यांना होणार आहे.